३१ जानेवारी, २०१७

धनु राशीतील शनीचे साधारण गोचर परिणाम

 लोकहो,
नुकताच शनी धनु राशीत प्रवेश करता झालेला आहे. हे भ्रमण गोचर भ्रमण असून  प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम पाहूयात.

मेषः
मेषेच्या भाग्यात शनी आला आहे. शनीची तृतीय दृष्टी लाभात असल्याने स्थावर मालमत्तेविषयक काही फायदे होतील. लेखन, करार मदार यात फायदे होतील.

वृषभः
अष्टमात आलेला शनी कामे लवकर होऊ देणार नाही. पैसा खेळता राहणार नाही. कोठेतरी अडकून राहील. विलंब होईल परंतु शनी पूर्ण नकारही देणार नाही.

मिथुनः
राशीच्या सप्तमात आलेला शनी प्रतिपक्षाकडून प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासूनच  पाठिंब्याचा प्रत्यय देईल. प्रतिपक्षात पत्नी, सहकारी यांचा समावेश होतो.

कर्कः
कर्केच्या षष्ठात आलेला शनी अनुभवी व्यक्तींकडून नव्या कामाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो. त्रासदायाक वाटले तरी या कामाला नकार देऊ नये. नवे शिकण्याची संधी याच काळात मिळू शकते.

सिंह ः
पंचमातील शनी संतती व शिक्षणाबाबत काही प्रश्न उपस्थित करेल. तो केवळ प्रश्न उपस्थित करून थांबणार नाही तर लाभही देईल. चिकाटी ठेवा.

कन्याः घरासंबंधी प्रश्न असतील तर चतुर्थात येत असलेला शनी ते किंचित रेंगाळवेल. जुन्या घरांची डागडुजी, बांधकाम यात लक्ष घालावे. घरातील वृध्द स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळः
तूळ राशीच्या तृतीयातील शनी करार मदार, कागदपत्रांबाबत सहकार्य करेल. तपशिलात चुका करू नका. एखाद्या अनुभवी लेखकाची मदत घ्या.

वृश्चिकः वृश्चिक मंडळींनी धनाची काळजी घ्यावी तसेच वाणीवर ताबा ठेवावा.पैशांचे प्रश्न अडकल्यासारखे होतील पण धीर धरणे आवश्यक आहे.  

धनुः
स्वस्थानाचा शनी तुम्हाला प्रगल्भ बनवण्याकरिता मदत करेल. स्वतःचे वाचन वाढवून, शहाण्या माणसांची सोबत धरून तुम्हीही त्याला मदत करणे गरजेचे आहे.

मकरः
शनी तुम्हाला बारावा येत असल्याने भ्रमनिरासाला सुरुवात होईल. वेगवेगळे अनुभव येऊन आधीच्या कल्पनेपेक्षा वस्तुस्थिती काहीशी निराळी असल्याचा प्रत्यय येईल.

कुंभः
शनी लाभात येत असल्याने स्थावर मालमत्तेसंबंधी काही लाभ होतील. वास्तूचे जुने प्रश्न सुटण्यास मदत होील.

मीन ः
राशीच्या दशमातील शनी तुम्हाला नवी कार्ये उभी करण्याकरिता मदत करेल. काम करीत रहा, मदत मिळत राहील.

सर्वांकरिता महत्त्वाची सूचनाः वर उल्लेखलेले सर्व लाभ संथ गतीने मिळणार असल्याने उतावीळ होऊ नये. तोटेही संथच गतीने होणार आहेत.