२४ जून, २०१४

पर्यावरण घरोघरी

     पर्यावरण हा आता खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे, हे वाक्य आता लेखांच्या सुरुवातीला लिहिण्यात अर्थ नाही. पर्यावरणविषयक जागृतीचा काळ सुरु होऊन आता दोन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. संपूर्ण जगातच या विषयाची चर्चा सुरु झालेली आहे. आपल्याकडे काही चांगले प्रयत्न होत आहेत आणि अनेकांना त्याचे गांभीर्य नाही. पर्यावरणविषयक प्रबोधनाच्या ध्यासाने झपाटले जाणारे जे काही जीव आहेत त्यापैकी एक जीव आहे दिलीप कुलकर्णी.
     श्री. कुलकर्णी हे अभियांत्रिकीचे पदविकाधारक. त्यांनी १९७८ पासून पुढे सहा वर्षे  नोकरी केली. १९८४ पासून नोकरी सोडून विवेकानंद केंद्राचे कार्य केले. १९९३ पासून पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी कोकणातील गावात जाऊन राहिले. गतिमान संतुलन या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी पर्यावरण घरोघरी हे महत्त्वाच्या विषयाची थोडक्यात ओळख करून देणारे पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक अतिशय उत्तम आहे. पर्यावरणाचे रक्षण का करायचे, याची नेमक्या भाषेत माहिती करून देणारे, अजिबात फाफटपसारा नसलेले हे पुस्तक आहे. पुस्तकाचा आकार दहा सेंटिमीटर बाय तेरा सेंटिमीटर एवढाच आहे. प्राथमिक शाळेत जाणारा मुलगाही झटकन हातात घेईल आणि वाचून काढेल, अशी ही छोटेखानी उपयुक्त लेखनकृती आहे. पुस्तकाच्या कमी किंमतीने त्याच्या लोकप्रियतेत मोठाच हातभार लावला आहे.
     पुणे येथील उज्ज्वल ग्रंथ भांडारात (०२०-२४४६२२६८) याबाबत चौकशी करावी. मला या पुस्तकाच्या पहिल्या दोन पानांतच उज्ज्वल ग्रंथ भांडाराचे नाव वितरक म्हणून दिसले. या ब्लॉगवर पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहता येईल.
     तेव्हा मित्रहो, हे पुस्तक जरूर वाचा, हे निराळे सांगण्याची आवश्यकता आहे का ?