२३ जुलै, २०१३

नोटपॅड..एक मध्यस्थ


    कित्येकदा आउटलूक एक्सप्रेसमध्ये किंवा मायक्रोसऑफ्ट आऊटलूक मध्ये आपल्याला एखादा मजकूर दुसरीकडून कॉपी करून पेस्ट करायचा असतो. नव्या मेलचा मजकूर एखाद्या पूर्वीच्या मेलसारखाच असतो. टाईप करत बसण्यापेक्षा आपण उचलेगिरी करतो. सिलेक्ट, कॉपी आणि पेस्ट या नेहमीच्या रस्त्याने आपण जातो. मजकूर बरेचदा वाकडातिकडा पेस्ट होतो. शिवाय, कधीकधी त्याची रचना बदलते. अक्षरशैली, आकार या बाबीही बदलतात. असे होणे आपल्याला अपेक्षित नसते. मजकूर जेथून कॉपी पेस्ट केला तेथून तसाच्या तसा पेस्ट व्हावा, अशी आपली अपेक्षा असते पण तांत्रिक पार्श्वभूमी सर्वत्र सारखी नसल्याने मजकुराचे बारा बाजतात आणि मजकूर हवा तसा बनविण्यासाठी आपण त्याच्याशी  झटापट करीत बसतो.
    यावर एक उपाय आहे. मजकूर कॉपी करावा व नोटपॅड मध्ये पेस्ट करावा. तसे केल्याने नोटपॅड त्याची मूळची रचना बदलून टाकते व त्याला पूर्ण शुध्द रुपात आणते. येथून मजकूर पुन्हा कॉपी करावा मेलमध्ये पेस्ट करावा. पेस्ट केल्यावर जे स्वरुप असते ते बरेचदा आपल्याला  हव्या त्या रचनेसारखे असते. किरकोळ फरक किंचित मेहनत घेऊन दर करता येतो.
    इंग्रजी मजकूराबाबत हे घडतेच पण मराठी मजकुरासंदर्भात ही बाब विशेषत्वाने जाणवते. दोन पक्षांमधील तंटे सोडविण्यासाठी एखाद्या त्रयस्थाची मध्यस्थ या नात्याने मदत घेतली जाते, हे सामाजिक सत्य येथे ध्यानात येण्यास हरकत नाही. समाज असो वा तंत्रज्ञान, जगात तत्त्वे सारखीच.

   

२२ मे, २०१३

कोणता फॉंट चांगला?

मित्रहो,

     इंग्रजीमधून लिहिण्यासाठी तसे विविध फॉंट वापरले जातात. उदा.एरिअल, टाईम्स न्यू रोमन, वर्दना इत्यादी. मी डॉक्युमेंटस् तयार करण्यासाठी विविध फॉंट वापरतो. मजकूर लिहून वेगवेगळे फॉंट त्यावर लावून पाहतो. जो चांगला भासतो, तो अखेर नक्की करतो. मला सगळेच फॉंट चांगले वाटत आले आहेत. प्रत्येक शैलीमध्ये काहीतरी आवडण्यासारखे आणि न आवडण्यासारखे असतेच.
    तरीही, हा प्रश्न उरतोच की, अक्षरांचा कोणता फॉंट सर्वार्थाने चांगला?
    या प्रश्नाचे नक्की उत्तर नाही. काही जणांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की, एरिअल हा फॉंट अधिक प्रमाणात वापरला जातो. इंटरनेटवर हुडकल्यानंतर लक्षात येते की, एरिअलसह टाईम्स न्यू रोमन हाही फॉंट सर्वाधिक वापरला जातो.
    वर्दना हा फॉंट भारतीय माणसाने तयार केला असता तर त्याने त्याला वंदना नाव दिले असते, असे मला सतत वाटत राहते.  
    

२० जानेवारी, २०१३

मायक्रोसॉफ्टच्याच दोन पध्दती

मित्र-मैत्रिणींनो,

     बहुतेक कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही मेल पध्दत वापरली गेली आहे. काही कंपन्यांमध्ये  आऊटलूक एक्सप्रेस ही पध्दत वापरली गेली आहे. कंपनी एकच असून या दोन पध्दती का, असा प्रश्न मला पडला होता.  याबाबत मी एका हार्डवेअर तज्ज्ञाला विचारले. त्याने सांगितले की, आऊटलूक एक्स्प्रेस ही पध्दत मायक्रोसॉफ्टसोबत आपोआप येते. मायक्रोसॉफ्ट आऊटलूक डानऊलोड करावे लागते आणि त्यासाठी निराळा सर्व्हर लागतो. पर्यायाने, खर्च व तदानुषंगिक बाबी वाढतात.
      खर्चाचा मुद्दा निराळा आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा की, मायक्रोसॉफ्ट आऊटलूकमध्ये रचना, नक्षीकामासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तेथे काम करताना खूप समाधान मिळते. आऊटलूक एक्सप्रेसमध्ये तितके समाधान मिळत नाही.